WhatsApp ब्लॉग

मित्रपरिवार, कुटुंबीय आणि इतर महत्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात राहण्यासाठी मदत करणे हेच WhatsApp मध्ये आमचे उद्दिष्ट आहे. याचा अर्थ असा की तुम्ही जिथे असाल तिथे सोपे, वापरण्यास सुलभ आणि कधीही वापरता येण्याजोगे उत्पादन निर्माण करणे. आम्ही मेसेजिंग आणि गटगप्पा यापासून सुरुवात केली. त्यानंतर आम्ही व्हॉइस कॉलिंग समाविष्ट केले आणि आम्ही ते असे केले की हजारो डिव्हाइसेस आणि प्लॅटफॉर्म्स वर संपूर्ण जगभरात ते चालू शकतात.

आज हे घोषित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की जनसमुदायास एकत्र जोडणाऱ्या आमच्या प्रयत्नांमध्ये आमचे नवीन पाऊल आहे - WhatsApp व्हिडिओ कॉलिंग. येणाऱ्या काही दिवसात WhatsApp चे १ अब्जहून अधिक वापरकर्ते Android, iPhone आणि Windows फोन डिव्हाईसेस वरून व्हिडिओ कॉल्स करू शकतील.

आम्ही हे फिचर यासाठी आणत आहोत कारण आम्हाला माहित आहे की कधीकधी फक्त ध्वनी संदेश आणि लिहिलेला मजकूर पुरेसा नसतो. तुमच्या नातवंडांचे पहिले पाऊल बघणे किंवा तुमच्या परदेशी शिकणाऱ्या मुलीचा चेहरा बघता येणे याची सर कशालाही येणे शक्य नाही. आणि केवळ अशा व्यक्ती ज्यांच्याकडे महागडे नवीन फोन आहेत किंवा जे अशा देशात राहतात ज्यांच्याकडे सर्वोत्तम सेल्युलर नेटवर्क उपलब्ध आहे अशांसाठीच नव्हे तर सगळ्यांसाठीच ही सेवा आम्हाला उपलब्ध करून द्यायची आहे.

काही वर्षांपासून व्हिडिओ कॉलिंग सुरु करण्याबद्दल आम्हाला अनेक वेळा विचारण्यात आलेले आहे, आणि अखेरीस हे फिचर जगाला उपलब्ध करून देण्यास आता आम्ही अतिशय उत्सुक आहोत. WhatsApp चा वापर करण्यासाठी आभारी आहोत आणि आमच्या सेवा सुधारण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू याची ग्वाही आम्ही तुम्हाला देतो.

संपूर्ण जगभरात असलेले तुमचे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्याबरोबर फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना त्यात काही अधिक सुधार व सानुकूल बदल करण्यासाठीचे नवीन मार्ग आज आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. WhatsApp चे नवीन कॅमेरा फिचर वापरून तुम्ही आता तुमच्या फोटो आणि व्हिडिओ वर लिहू शकता किंवा चित्र रेखाटू शकता तसेच अभिव्यक्त होण्यासाठी इमोजी देखील जोडू शकता.

तुम्ही जेव्हा WhatsApp च्या कॅमेराद्वारे नवीन फोटो अथवा व्हिडिओ घेता किंवा जे तुमच्या फोनवर अगोदरपासूनच आहे ते WhatsApp मध्ये उघडता तेव्हा तुम्हाला आपोआपच ही नवीन संपादन साधने दिसतील. तुम्हाला एखाद्याची किती आठवण येत आहे हे दाखविण्यासाठी तुम्ही मोठ्ठा लाल बदाम पाठवू शकता किंवा तुमची आवडती इमोजी जोडू शकता - कधीकधी एखाद्या चित्राकृती मध्ये सहस्त्र शब्दांपेक्षाही अधिक गर्भितार्थ दडलेला असतो. या प्रतिमेवर तुम्ही मजकूर देखील लिहू शकता तसेच त्याचा रंग आणि फॉन्ट स्टाईल देखील बदलू शकता.

परफेक्ट सेल्फी घेण्यासाठी WhatsApp चे नवीन कॅमेरा फिचर वापरून तुम्ही आता समोरील बाजूला फ्लॅश देखील वापरू शकता. जेथे कमी प्रकाश असेल किंवा रात्र असेल तेव्हा या फिचर मुळे तुमची स्क्रीन उजळून निघेल आणि तुमच्या फोटोचा दर्जा सुधारेल. व्हिडिओ रेकॉर्ड करताना सहज झूम करता यावे यासाठी आम्ही झूम फिचर देखील यात जोडले आहे - झूम इन आणि आऊट करण्यासाठी तुमचे बोट वर आणि खाली स्लाईड करा. तसेच स्क्रीनवर दोन वेळा टॅप करून पुढील व मागील कॅमेरामध्ये चटकन अदलाबदल करा.

Android फोनवर हे नवीन कॅमेरा फिचर आजपासून उपलब्ध होईल आणि लवकरच iPhone वर येईल. आम्ही आशा बाळगतो की जेव्हा पुढच्यावेळी तुम्ही तुमचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर कराल तेव्हा या नवीन फीचरचा तुम्ही आनंद घ्याल.

आज आम्ही WhatsApp चे 'अटी आणि गोपनीयता धोरण' ४ वर्षानंतर अपडेट करत आहोत. पुढील काही महिन्यात लोकांशी संवाद साधून व्यवहार करण्याचे निरनिराळे मार्ग तपासून पाहण्याच्या आमच्या प्लॅनचा तो एक भाग आहे. आम्ही Facebook मध्ये सामील झालो आहोत आणि नुकतीच आम्ही नवीन फीचर्स जसे की एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत कूटबद्धता, WhatsApp कॉलिंग, आणि मेसेजिंग साधने जसे की वेब आणि डेस्कटॉप वरील WhatsApp यांना आमचे अपडेटेड डॉक्युमेंट प्रतिबिंबित करते. तुम्ही येथे पूर्ण डॉक्युमेंट्स वाचू शकता. आमच्या अॅपच्या नवीन सपोर्टेड आवृत्तीं वरील सर्वांना या अपडेट बद्दल सूचित करण्यात आले आहे आणि WhatsApp वापरणे चालू ठेवण्यासाठी तुम्ही 'सहमत' वर टॅप करा असे तुम्हाला विचारण्यात येईल.

आपल्या मित्रांशी आणि त्यांच्या आयुष्यातील मौल्यवान व्यक्तींशी संपर्कात राहण्यासाठी लोक आमचे अॅप दररोज वापरतात आणि यात काहीही बदलणार नाही. परंतु जसे आम्ही या वर्षाच्या सुरुवातीला घोषित केले, आम्ही असे मार्ग शोधत आहोत ज्याद्वारे लोकांशी संवाद साधून व्यवहार करणे आणि ते करत असतानाही कोणत्याही तृतीयपक्षीय जाहिरातींचे बॅनर आणि स्पॅम चा अनुभव न घेता ते करणे शक्य होईल. मग ते एखाद्या बँकेकडून एखाद्या संभाव्य फसव्या व्यवहाराविषयी ऐकत असाल किंवा एअरलाईन कंपनीकडून एखादी फ्लाईट उशीरा येत असल्याची सूचना असेल, आपल्यापैकी अनेकजण ही माहिती टेक्स्ट मेसेज आणि फोन कॉल्स च्या माध्यमातून इतर कोणाकडूनही ही माहिती मिळवू शकतात. आम्ही पुढील काही महिने हे फीचर्स टेस्ट करण्यामध्ये घालवू परंतु तसे करण्यासाठी आम्हाला आमचे अटी आणि गोपनीयता धोरण अपडेट करणे गरजेचे आहे.

आम्हाला आमचे डॉक्युमेंट्स अपडेट करून हे सुद्धा स्पष्ट करायचे आहे की आम्ही एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजेच संपूर्ण कूटबद्धीकरण सुद्धा सामील केले आहे. तुम्ही आणि ज्या व्यक्तीना तुम्ही मेसेज करीत आहेत ती व्यक्ती जेव्हा WhatsApp ची नवीन सुधारित आवृत्ती वापरत असते तेव्हा तुमचे मेसेज मूलभूतरित्या एन्क्रिप्ट केलेले असतात याचा अर्थ फक्त तुम्हीच त्यांना वाचू शकता. जरी आम्ही Facebook शी पुढील काही महिन्यात अधिक समन्वय साधणार असलो तरी तुमचे एन्क्रिप्टेड मेसेज हे खाजगीच राहतील आणि कोणीही त्यांना वाचू शकणार नाही. WhatsApp नाही, Facebook नाही, कोणीही नाही. आम्ही अजूनही तुमचा फोन नंबर जाहिरातदारांना विकत नाही अथवा त्यांच्याशी शेअर करत नाही.

परंतु Facebook बरोबर समन्वय साधल्यामुळे, आम्हाला काही गोष्टी करणे शक्य होते जसे की लोक आमच्या सर्व्हिसेस किती वेळा वापरतात याच्या बेसिक मेट्रिक्स चा आढावा घेणे तसेच त्याहूनही महत्वाचे म्हणजे WhatsApp वरील स्पॅमशी लढा देणे. आणि तुमचा फोन नंबर Facebook च्या सिस्टिम शी जोडला गेला आणि की Facebook तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे मित्र सुचवू शकते आणि जर तुमचे त्याच्यावर खाते असेल तर तुम्हाला अधिक योग्य जाहिराती दाखवू शकते. उदाहरणार्थ, तुम्हाला ज्याबद्दल काहीच माहित नाही त्यापेक्षा तुम्हाला अशा कंपनीची जाहिरात दिसेल ज्याच्याशी तुमचा संबंध आहे. तुमचा डेटा वापर कसा नियंत्रित करावा याबद्दल अधिक जाणून घ्या, येथे.

खाजगी संभाषणाबद्दल आमची जी मूल्ये आहेत त्याला कदापिही धक्का दिला जाणार नाही आणि आम्ही अशी ग्वाही देतो की आम्ही नेहमीच तुम्हाला जलद, सुलभ आणि विश्वसनीय अनुभव WhatsApp वर प्रदान करू. नेहमीप्रमाणेच आम्ही तुमच्या अभिप्रायाची प्रतीक्षा करीत आहोत. WhatsApp चा वापर करण्यासाठी आम्ही अत्यंत आभारी आहोत.

मित्रपरिवार व कुटुंबाशी बोलण्यासाठी WhatsApp कॉलिंगचा वापर करायला लागून लोकांना आता एका वर्षाहून अधिक काळ झाला आहे. विशेषतः परदेशी राहणाऱ्या लोकांशी संपर्कात राहण्यासाठी तो एक उत्तम मार्ग आहे किंवा जेव्हा फक्त मेसेज पाठवणे पुरेसे नसते तेव्हाही. आज WhatsApp वर सुमारे 10 कोटी व्हॉइस कॉल्स केले जातात - म्हणजेच प्रतिसेकंद 1,100 कॉल्स ! आम्हाला अभिमान वाटतो की हे फिचर इतक्या लोकांना उपयोगाचे वाटले आणि आज आम्ही अशी ग्वाही देतो की पुढील काही महिन्यात आम्ही ते अजूनच दर्जेदार करू.

आज आम्ही नवीन डेस्कटॉप अॅप ची घोषणा करीत आहोत ज्यायोगे तुम्हाला कधीही आणि कोठेही एकमेकांशी संपर्कात राहण्याचा नवीन मार्ग उपलब्ध होईल - मग तो तुमचा फोन असो किंवा घर अथवा कार्यालयातील संगणक असो. WhatsApp वेब प्रमाणेच आमचे डेस्कटॉप अॅप देखील तुमच्या फोनचेच विस्तारित स्वरूप आहे : असे अॅप जे तुमच्या मोबाईल डिव्हाईस संभाषणे आणि संदेश प्रतिबिंबित करते.

नवीन डेस्कटॉप अॅप हे Windows 8+ and Mac OS 10.9+ वर उपलब्ध आहे आणि ते तुमच्या मोबाईलवरील WhatsApp शी सुसंबद्ध केलेले असते. हे अॅप डेस्कटॉप वर नेटिव्ह पद्धतीने कार्य करते ज्यामुळे तुम्हाला नेटिव्ह डेस्कटॉप अधिसूचना, सुयोग्य कीबोर्ड शॉर्ट्कटस आणि इतर अधिक सुविधा प्रदान करते.

अॅप डाउनलोड करण्यासाठी तुमच्या डेस्कटॉप ब्राउझर वर https://www.whatsapp.com/download ला भेट द्या. त्यानंतर अॅप उघडा आणि तुमच्या फोनवरील WhatsApp अॅप वापरून क्यु आर कोड स्कॅन करा (सेटिंग्ज मध्ये WhatsApp वेब मेनू बघा).

WhatsApp वेब प्रमाणेच आमचे डेस्कटॉप अॅप देखील तुमच्या मित्रपरिवार व कुटुंबीयांना संदेश पाठविण्याची सोय उपलब्ध करून देते, तुमचा फोन खिशात असला तरीही.

तुमचा डेटा आणि संभाषणे जास्तीत जास्त सुरक्षित ठेवण्याला WhatsApp नेहमीच प्राधान्य देते. आणि आज, आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आम्ही ती टेकनॉलॉजिकल डेव्हलपमेंट पूर्ण केली आहे ज्यायोगे WhatsApp सुरक्षित खाजगी संभाषणे पुरवून त्यात अव्वल दर्जाचे स्थान मिळवेल, ती आहे : एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण कूटबद्धीकरण. आता इथून पुढे तुम्ही आणि तुमचे संपर्क जेव्हा WhatsApp ची सुधारित आवृत्ती वापरत असता तेव्हा तुम्ही करत असलेला प्रत्येक कॉल, प्रत्येक मेसेज, फोटो, व्हिडिओ, आणि व्हॉइस मेसेज हे मूलभूतरित्या एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड केलेले असतील, अगदी गटगप्पा देखील.

ही एक अतिशय सोपी कल्पना आहे : जेव्हा तुम्ही मेसेज पाठविता, तेव्हा फक्त तुम्ही ज्या व्यक्तीला तो मेसेज पाठविला आहे किंवा ज्या गटाला तो मेसेज पाठविला आहे फक्त आणि फक्त तेच ते मेसेज वाचू शकतात. इतर कोणीही नाही. सायबर क्रिमिनल्स नाही. हॅकर्स नाही. अन्याय्य राजवट नाही. अगदी आम्ही सुद्धा नाही. एन्ड टू एन्ड एन्क्रिशन WhatsApp मध्ये खाजगी संभाषणे करण्यासाठी मदत करते - हे जणू काही समक्ष संवाद साधल्याप्रमाणेच वाटेल.

जर तुम्हाला हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन कसे काम करते याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा असेल तर कृपया त्याबद्दल येथे वाचा. परंतु तुम्हाला सर्वांना हे माहित असणे गरजेचे आहे की हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट झालेले मेसेज फक्त तोच प्राप्तकर्ता वाचू शकतो ज्या प्राप्तकर्त्याला तुम्ही संदेश पाठविला आहे. आणि जर तुम्ही WhatsApp ची नवीन सुधारित आवृत्ती वापरात असाल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही, तुमचे सर्व मेसेज हे नेहमी मूलभूतरित्या एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केलेले असतात.

आपण अशा जगात राहतो ज्यामध्ये पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात तुमचा डेटा डिजिटल केला गेला आहे. आपण दररोज हे ऐकतो की एखादे अत्यंत खाजगी रेकॉर्ड हे अनधिकृतरित्या वापरले गेले किंवा चोरण्यात आले. आणि जर काहीच हालचाल केली नाही तर दिवसेंदिवस लोकांचा डिजिटल डेटा आणि संभाषणे ही भविष्यकाळात अधिकच सायबर आक्रमणांच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. सुदैवाने, एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन या सर्वांपासून आपले रक्षण करते.

एन्क्रिप्शन हे सध्याचे सर्वात महत्वाचे नवीन साधन आहे जे सरकारने, कंपन्यांनी आणि प्रत्येक व्यक्तीने सुरक्षितता जोपासण्यासाठी त्याला प्रोत्साहित केले पाहिजे. नुकतीच एन्क्रिप्शन सर्व्हिसेस आणि त्याची कायदेशीर अंमलबजावणी याविषयी बरीच चर्चा करण्यात आली आहे. जरी आम्ही या कायदेशीर अंमलबजवाणीचे महत्व जाणून आहोत तरी जर एन्क्रिप्शन सशक्त नसेल तर लोकांची माहिती सायबर क्रिमिनल्स पर्यंत पोहोचणे, हॅकर्स आणि धूर्त राजवटींपासून लोकांचा डेटा असुरक्षित होण्याचा संभाव्य धोका यात आहे.

जरी सध्या तुम्ही करत असलेली प्रत्येक गोष्ट मूलभूतरित्या एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन करणारा काही मोजक्या प्लटफॉर्ममधील WhatsApp एक आहे. आम्ही अशी आशा करतो की हे भविष्यकाळातील वैयक्तिक संभाषणाचे प्रतिनिधित्व करेल.

WhatsApp च्या पायाभूत मूल्यांपैकी लोकांची खाजगी संभाषणे सुरक्षित ठेवणे हे एक अत्यंत महत्वाचे मूल्य आहे, आणि माझ्यासाठी ते अतिशय खास आहे. मी स्वतः काम्युनिस्ट राजवटीच्या अधिपत्याखाली USSR मध्ये वाढलो आहे आणि एखादी गोष्ट मुक्तपणे बोलू न शकणे हे माझे कुटुंब युनायटेड स्टेट्स मध्ये स्थलांतरीत होण्याचे महत्वाचे कारण आहे.

आज जगभरात करोडहून अधिक लोक आपल्या मित्रपरिवार व कुटुंबियांशी संपर्कात राहण्यासाठी WhatsApp चा वापर करतात. आणि आता त्यातील एकूण एक व्यक्ती WhatsApp वर मुक्तपणे आणि सुरक्षितपणे संवाद साधू शकतात.

यान आणि ब्रायन

या आठवड्याच्या सुरुवातीला WhatsApp ने सात वर्षे पूर्ण केली. हा एक अत्यंत आल्हाददायक प्रवास होता आणि येणाऱ्या काळात आम्ही सुरक्षितता फीचर्स वर अधिकच लक्ष केंद्रित करू तसेच तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींशी संपर्कात राहण्यासाठी नवनवीन मार्ग शोधण्यासाठी प्राधान्य देऊ.

वर्धापनदिनाच्या निमित्ताने आम्ही एक नजर भूतकाळातही टाकू इच्छितो. आम्ही जेव्हा २००९ मध्ये WhatsApp सुरु केले, तेव्हा मोबाईलचा वापर हा आजच्या पेक्षा खूप वेगळा होता. तेव्हा Apple App Store हे काहीच महिन्यांपूर्वी उदयास आले होते. तेव्हाचे ७०% स्मार्टफोन हे BlackBerry आणि Nokia यांच्या ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असत. Google, Apple आणि Microsoft यांनी प्रदान केलेल्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम्स ज्यांचा सध्याचा मार्केट मधील खप ९९.५ टक्के आहे, तेव्हा तो २५ टक्के इतका देखील नव्हता.

आम्ही जेव्हा पुढील ७ वर्षांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्ही आमचे लक्ष अशा मोबाईल प्लॅटफॉर्म्स वर केंदित करू ज्याचा वापर बराच मोठा जनसमुदाय करतो. त्यामुळे २०१६ च्या अखेर पासून आम्ही WhatsApp मेसेंजर साठी खालील मोबाईल प्लॅटफॉर्म्सला सपोर्ट करणार नाही :

 • BlackBerry OS and BlackBerry 10
 • Nokia S40
 • Nokia Symbian S60
 • Android 2.1 and Android 2.2
 • Windows Phone 7.1
 • iPhone 3GS/iOS 6

जरी ही मोबाईल डिव्हाइसेस आमच्या कहाणीचा मोठा भाग आहेत तरी आमच्या अॅप मध्ये जी नवीन वैशिष्ट्ये आम्हाला आणायची आहेत ती सुरळीतपणे चालण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही.

हा आमच्या साठी अतिशय अवघड निर्णय होता परंतु तो योग्य आहे कारण त्यामुळेच आम्हाला लोकांना त्यांच्या मित्रपरिवार, कुटुंबीय आणि आप्तेष्टांशी संपर्कात राहण्यासाठी नवनवीन मार्ग उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. जर तुम्ही यापैकी एखादे डिव्हाईस वापरत असाल आणि WhatsApp चा वापर चालू ठेवायचा असेल तर आम्ही अशी शिफारस करतो की तुम्ही नवीन Android, iPhone, किंवा Windows Phone मध्ये स्वतःला २०१६ संपण्यापूर्वी अद्यतनित करून घ्यावे.

अद्यतने : आता खालील प्लॅटफॉर्म्स वर WhatsApp वापरणे शक्य होणार नाही :

 • जून ३० २०१७ नंतर Nokia Symbian S60
 • ३१ डिसेम्बर २०१७ नंतर BlackBerry OS and BlackBerry 10
 • ३१ डिसेम्बर २०१७ नंतर Windows Phone 8.0 आणि त्याहून जुन्या आवृत्ती
 • ३१ डिसेम्बर २०१७ नंतर Nokia S40
 • १ फेब्रुवारी २०२० नंतर Android versions 2.3.7 आणि त्याहून जुन्या आवृत्ती

टीप : आम्ही या प्लॅटफॉर्म वर सक्रियपणे डेव्हलपमेंट करीत नसल्यामुळे नाही वैशिष्ट्ये अचानक काम करणे बंद करू शकतात.

आजपर्यंत, एक अब्ज लोक WhatsApp चा वापर करीत आहेत.

याचा अर्थ जगातील सातपैकी एक व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींशी, त्यांच्या मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबियांशी संपर्कात राहण्यासाठी महिन्यातून एकदा WhatsApp चा वापर करते.

या माईलस्टोनचा आम्हाला अभिमान आहे आणि आपण सर्व ज्या अनेक कारणांसाठी WhatsApp वापरता त्यासाठी आम्ही विनम्रतापूर्वक तुमचे अभिनंदन करतो. एखाद्या नैसर्गिक आपत्ती वेळी द्यायची संवेदनशील माहिती असो किंवा आरोग्यविषयक तत्पर सेवा असो, साथीदाराचा शोध घ्यायचा असो, एखादा छोटा व्यवसाय वाढवायचा असेल, साखरपुड्याची अंगठी घ्यायची असेल किंवा सुखी जीवनाचा शोध घ्यायचा असेल - इतर व्यक्तींच्या आयुष्यातील एक लहानसा भाग बनून त्यांचे आयुष्य सुधारण्यासाठी मदत करता येणे यामध्ये आम्हाला सन्मान वाटतो.

आणि जरी आपण एकत्रितपणे सात वर्षे जी प्रगती केली आहे तरी ती करत असताना आमचे ध्येय मुळीच बदललेले नाही. WhatsApp एका सध्या सरळ कल्पनेने सुरु झाले : या जगातील सर्व लोकांना त्याच्या मित्रांशी आणि कुटुंबियांशी कोणतेही शुल्क किंवा क्लृप्त्यांशिवाय संपर्कात राहण्याची हमी देणे.

जरी आज आम्ही हे यश चाखत असलो तरीदेखील आमचे ध्येय सारखेच आहे. WhatsApp चा वेग, विश्वासार्हता, सुरक्षितता आणि साधेपणा याचा दर्जा सुधारण्यासाठी आमची टीम दररोज सातत्याने प्रयत्न करते. आम्ही आजवर इथंपर्यंत आलो आहोत याचा आम्हाला अतिशय हर्ष झाला आहे. परंतु आता, परत कामाला लागायला हवे - कारण अजून ६ अब्ज लोकांना WhatsApp वर आणायचे आहे आणि तो पल्ला अजून खूप लांब आहे.

आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांशी संपर्कात राहण्यासाठी आता जगभरातून जवळजवळ १ अब्जहूनही अधिक लोक WhatsApp चा वापर करतात. अगदी इंडोनेशिया मधील नुकतेच वडील झालेले कोणी एखादे त्यांच्या कुटुंबियांसोबत फोटो शेअर करण्यारी व्यक्ती असो कि स्पेनमधील विदयार्थी त्याच्या पूर्वीच्या मित्राची चौकशी करत असो कि ब्राझील मधील डॉक्टर्स त्यांच्या रुग्णांशी संपर्क ठेवत असो, सर्व लोक WhatsApp वर त्याच्या जलद, सुलभ आणि विश्वासार्ह सेवेमुळे विसंबून राहतात.

आणि म्हणूनच आम्हाला हे घोषित करत असताना अतिशय आनंद होत आहे की WhatsApp आता येथून पुढे सबस्क्रिप्शन शुल्क लागू करणार नाही. गेली अनेक वर्ष, आम्ही काही वापरकर्त्यांना पहिल्या वर्षानंतर काही शुल्क आकारत असू. जसे आमचा विस्तार वाढत गेला तसे आमच्या लक्षात आले की ही पद्धती योग्य नव्हती. अनेक WhatsApp वापरकर्त्यांकडे डेबिट अर्थात क्रेडिट कार्ड नंबर नसत आणि त्यामुळे त्यांना अशी भीती वाटे की एका वर्षानंतर त्यांच्या आप्तेष्टांबरोबरचा संपर्क तुटेल. त्यामुळे पुढील काही आठवड्यामध्ये, आम्ही अॅपच्या विविध आवृत्तींमधून फी आकारणे काढून टाकू आणि येथून पुढे आमच्या सेवा वापरण्यासाठी कोणतेही शुल्क पडणार नाही.

अर्थातच, लोकांना आश्चर्य वाटेल की नोंदणी शुल्क रद्द केले तर WhatsApp कार्य करणे कसे चालू ठेवेल आणि याचा अर्थ आम्ही तृतीयपक्षी जाहिरातींना मान्यता देत आहोत असा तर नाही ना. याचे उत्तर - 'नाही' असे आहे. या वर्षीपासून आम्ही अशी काही साधने टेस्ट करू ज्यामुळे तुम्ही अशा काही व्यवसायांशी आणि संस्थांशी WhatsApp वापरून संवाद साधू शकता ज्यामध्ये तुम्हाला रस असेल. याचा अर्थ तुम्ही तुमच्या बँकेशी संवाद साधू शकता आणि जाणून घेऊ शकता की तुमच्या खात्यामध्ये काही संशयास्पद घडामोडी झाल्या आहेत का, किंवा एअरलाईनशी संपर्क साधून उशीर झालेल्या फ्लाईटबद्दल जाणून घेऊ शकता. आपण सर्व हे इतर मार्गांनी सध्या जाणून घेऊच शकतो - जसे की टेक्स्ट मेसेज आणि फोन कॉल - त्यामुळेच आम्ही नवीन काही साधने टेस्ट करत आहोत ज्यामुळे हे सर्व WhatsApp वर करणे अतिशय सोपे होईल आणि आम्ही कोणत्याही तृतीय पक्षी जाहिराती आणि स्पॅम शिवाय तुम्हाला उत्तम सेवा प्रदान करू शकू.

आम्हाला अशी आशा आहे की तुम्ही WhatsApp मध्ये येऊ घातलेल्या बदलांचे उत्साहाने स्वागत कराल, आम्ही आपल्या अभिप्रायाचे नेहमीच स्वागत करू.

आज, प्रथमच लाखो लोकांना WhatsApp वेब ब्राउझर वर वापरणे शक्य होणार आहे. आमचा वेब क्लाएंट हे तुमच्या फोनचेच विस्तारित रूप आहे : वेब ब्राउझर तुमच्या गप्पा आणि संदेश तुमच्या मोबाईल वरून प्रतिबिंबित होतात -- याचा अर्थ तुमचे सर्व संदेश तुमच्या फोनवर देखील चालू असतात.

तुमचा वेब ब्राउझर तुमच्या WhatsApp क्लाएंटला जोडण्यासाठी https://web.whatsapp.com हे तुमच्या Google Chrome ब्राउझर वर उघडा. तुम्हाला क्यू-आर कोड दिसेल -- हा कोड WhatsApp मधून स्कॅन करा , आणि WhatsApp वेब वर वापरण्यास सज्ज व्हा. आता तुम्ही तुमच्या फोनवरील WhatsApp हे वेब क्लाएंट बरोबर जुळविलेले राहील. तुमचा फोन इंटरनेटशी जोडलेला असणे गरजेचे आहे आणि कृपया खात्री करून घ्या की तुम्ही WhatsApp ची नवीन सुधारित आवृत्ती वापरत आहात. सध्या Apple प्लॅटफॉर्म वरील मर्यादेमुळे आम्ही वेब क्लाएंट iOS साठी प्रदान करू शकत नाही.

आम्हाला अशी आशा आहे की दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला वेब क्लाएंट उपयुक्त ठरेल.