WhatsApp ब्लॉग

FIGHTCLUBQUOTE

ब्रायन आणि मी, आम्ही एकत्रितपणे २० वर्षे Yahoo! येथे काम केले, ती साईट कार्यरत राहावी म्हणून अविरत परिश्रम केले आणि हो जाहिरात विक्रीचे किचकट कामदेखील खूप मेहनत घेऊन केले, कारण Yahoo! असेच चालायचे. ते डेटा गोळा करत आणि त्यानुसार माहिती असलेली वेबपेजेस प्रदान करत असत आणि त्यानुसार जाहिरात विक्री करीत असत.

आम्ही Yahoo! च्या वाढीला कसे ग्रहण लागत गेले आणि Google द्वारे कसे मागे पाडण्यात आले ते पाहिले आहे....एक अधिक कार्यक्षम आणि फायदा करून देणारा जाहिरात विक्रेता. त्यांना माहित असे की तुम्ही काय शोधत आहात आणि ते त्यानुसार तुमचा डेटा गोळा करीत आणि अधिक उत्तम जाहिरात विक्री करीत असत.

आजकालच्या काळात सर्व कंपन्यांना तुमच्या बद्दल सर्व काही माहित असते, तुमचे मित्र, तुमच्या आवडी निवडी आणि जाहिरात विक्रीसाठी ते सर्वकाही वापरतात.

जेव्हा आम्ही तीन वर्षांपूर्वी स्वतः काही सुरु करण्याच्या उद्देशाने बसलो हातो तेव्हा आम्हाला अजून एक जाहिरात विक्री करणारी फॅक्टरी मुळीच निर्माण करायची नव्हती. आम्हाला अशी एखादी सेवा सुरु करायची होती ज्याची लोकांना गरज आहे आणि ज्यामुळे त्यांचे पैसे वाचतील आणि त्यांचे आयुष्य अधिक उत्तम करण्यासाठी खारीचा वाट उचलता येईल. आम्हाला विश्वास होता की आम्ही हे सर्व करू शकलो तर आम्ही शुल्क आकारू शकतो. आम्हाला विश्वास होता कि आम्ही हे करू शकतो जे करण्याचा अनेक लोक दररोज प्रयत्न करतात : जाहिराती टाळण्याचा प्रयत्न.

कोणीही नवीन जाहिराती बघण्यासाठी उत्साहाने सकाळी उठत नाही अथवा उद्या कोणत्या नवीन जाहिराती बघायला मिळणार या विचाराने कोणीही झोपायला जात नाही. आम्हाला माहिती आहे की लोक त्या दिवशी ज्या लोकांशी गप्पा मारल्या (किंवा ज्यांच्याशी गप्पा मारल्या नाहीत त्याबद्दल) त्यांच्या बद्दल विचार करत असतात. आम्हाला WhatsApp असे करायचे होते की जे तुम्हाला जागे ठेवेल...आणि जे पाहण्यासाठी तुम्ही सकाळी उत्साहात असाल. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम जाहिराती बघण्याचा उत्साह कोणालाच नसतो.

जाहिराती केवळ व्यत्यय निर्माण करत नाहीत तर ते तुमच्या बुद्धीचा अपमान करतात आणि तुमची विचारप्रक्रियाच खंडित करतात. प्रत्येक कंपनी जी जाहिरात विक्री करते, त्यामध्ये अनेक इंजिनिअर्स हे डेटा मायनिंगच्या कामामध्ये व्यतीत करतात, तुमची खाजगी माहिती गोळा करण्यासाठी अधिकाधिक सरस कोड लिहितात, त्यासाठी सर्व्हर्स अपग्रेड करत राहतात तसेच हे सुनिश्चित करतात की सर्व डेटा व्यवस्थितपणे नोंदून तो जमा केला आहे आणि मग तो पॅक करून पाठविला जातो.... आणि यामुळे एवढेच होते की तुमच्या ब्राउझर किंवा मोबाईल स्क्रीनमध्ये आता जरा वेगळ्या जाहिरातींचे बॅनर्स दिसू लागतात.

लक्षात ठेवा, जेव्हा जाहिरातींचा वापर केलेला असतो तेव्हा तुम्ही म्हणजे वापरकर्ता हेच एक उत्पादन असते.

WhatsApp मध्ये आमचे इंजिनिअर्स हे त्यांचा सर्व वेळ बग दुरुस्त करण्यामध्ये, नवनवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यामध्ये व्यस्त असतात आणि जगभरात सर्वांच्या मोबाईलमध्ये उत्तम, किफायतशीर आणि विश्वासार्ह मेसेजिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रोजच्या कामामध्ये लहान मोठ्या गोष्टींकडे देखील बारीक कटाक्ष ठेवतात. हे आमचे उत्पादन आहे आणि तोच आमचा ध्यास आहे. तुमच्या डेटाशी आम्हाला काहीही कर्तव्य नाही.

जेव्हा लोक आम्हाला विचारतात की तुम्ही WhatsApp वापरण्यासाठी शुल्क का आकारता, तेव्हा आम्ही हेच म्हणतो की "तुम्ही दुसऱ्या पर्यायाचा विचार केला आहे का ?"