आम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, आता WhatsApp च्या डेस्कटॉप ॲपवरून सुरक्षित आणि गोपनीय वन-टू-वन व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरात WhatsApp वरून व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे असे आम्हाला दिसले. हे कॉल्स अनेकदा प्रदीर्घ होते असेही आमच्या लक्षात आले. नववर्षाच्या पूर्वसंध्येला तर एकाच दिवसात विक्रमी १.४ अब्ज व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स करण्यात आले होते. अनेक लोक आपल्या कुटुंबापासून, प्रियजनांपासून दूर आहेत, कामाच्या नव्या पद्धतीशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत आहेत हे आम्ही जाणतो. तुम्ही जगभरात कुठेही असा, कोणतेही डिव्हाइस वापरत असा, तुम्हाला तुमची संभाषणे समोरासमोर होणाऱ्या संभाषणांइतकीच जवळची वाटावी असे WhatsApp ला वाटते.
हे कॉल्स मोठ्या स्क्रीनवर करता आले तर काम करणे, सहकाऱ्यांशी बोलणे सोपे होते, तसेच तुमच्या कुटुंबीयांना मोठ्या स्क्रीनवर स्पष्टपणे पाहता येते. शिवाय, कॉलवर बोलण्यासाठी हाताची गरज लागत नसल्याने बोलता बोलता रूममध्ये फिरताही येते. डेस्कटॉप कॉलिंग अधिक उपयुक्त ठरावे यासाठी आम्ही ते पोर्ट्रेट आणि लॅंडस्केप अशा दोन्ही मोडमध्ये काम करेल याची खात्री केली आहे. कॉलिंग विंडो ही तुमच्या कॉंप्युटर स्क्रीनवर एका स्टॅंडअलोन, आकार कमीजास्त करता येणाऱ्या विंडोच्या स्वरूपात सर्वात वर दिसत असल्याने ब्राउझर टॅबमध्ये किंवा सुरू असलेल्या इतर विंडोजमध्ये तुमचे व्हिडिओ चॅट हरवून जाणार नाही याचीही खात्री करण्यात आली आहे.
WhatsApp वरील व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असतात. तुम्ही तुमच्या फोनवरून कॉल करा किंवा कॉंप्युटरवरून, WhatsApp हे कॉल्स ऐकू किंवा पाहू शकत नाही. तुम्हाला अतिशय विश्वसनीय आणि उच्च दर्जाचा कॉलिंग अनुभव मिळावा यासाठी आम्ही WhatsApp डेस्कटॉप ॲपवर सर्वप्रथम वन-टू-वन कॉल्सची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. कालांतराने, आम्ही या फीचरमध्ये ग्रुप व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही समाविष्ट करणार आहोत.
लोकांना त्यांच्या कुटुंबासोबत व प्रियजनांसोबत सुरक्षित आणि गोपनीय कॉलिंगचा अनुभव आवडेल अशी आशा वाटते. Windows पीसीवर किंवा Mac वर डेस्कटॉप ॲप कसे डाउनलोड करावे याबद्दल आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी हा लेख पहा.
आम्ही WhatsApp वापरकर्त्यांना आमच्या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन कशा प्रकारे करायला सांगणार आहोत याबद्दलची अपडेट केलेली माहिती आज देणार आहोत. यापूर्वी या अपडेटविषयी अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले, त्यामुळे अनेक गैरसमज पसरले आणि हे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही अजूनही अविश्रांत काम करत आहोत.
आम्ही तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की, या अपडेटमधून आम्ही एखाद्या बिझनेससोबत चॅट किंवा शॉपिंग करण्याच्या नवीन मार्गांची माहिती देत आहोत. कृपया लक्षात घ्या, की एखाद्या बिझनेससोबत संभाषण करावे की नाही ही निवड पूर्णपणे तुमची आहे. तुमच्या वैयक्तिक मेसेजेसना WhatsApp च्या एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनचे संरक्षण लाभलेले आहे आणि त्यामुळेच, WhatsApp तुमचे वैयक्तिक मेसेजेस वाचू किंवा ऐकू शकत नाही.
हे आम्ही अधिक चांगल्या प्रकारे कसे हाताळू शकलो असतो, यावर आम्ही गांभीर्याने विचार केला आहे. आम्ही नेहमीच एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनचा पुरस्कार केला आहे हे आमच्या वापरकर्त्यांना कळावे अशी आमची इच्छा आहे आणि त्यातून वापरकर्त्यांचे खाजगीपण व सुरक्षितता जपणे हेच आमचे ध्येय असते यावर वापरकर्त्यांनी विश्वास ठेवावा. यामुळेच आम्ही 'स्टेटस' फीचरच्या मदतीने आमची मूल्ये थेट WhatsApp मधूनच आमच्या वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आमचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अजून प्रयत्न करणार आहोत.
येत्या काही आठवड्यांमध्ये आम्ही WhatsApp मध्ये एक बॅनर दाखवणार आहोत. हे बॅनर लोकांना आणखी माहिती देईल आणि लोकांना ती माहिती त्यांच्या सोयीने वाचता येईल. या अपडेटविषयी असलेल्या प्रश्नांना उत्तरे देता यावीत यासाठी आम्ही आणखी माहितीही समाविष्ट केली आहे. कालांतराने, आम्ही लोकांना हे अपडेट्स स्वीकारण्याची आठवण करून देऊ, जेणेकरून त्यांना WhatsApp अव्याहत वापरता यावे.
आम्ही WhatsApp ची सेवा पूर्णपणे मोफत कशी देऊ शकतो हेदेखील लोकांना कळणे अतिशय महत्त्वाचे आहे असे आम्हाला वाटते. दर दिवशी जगभरातील करोडो लोक WhatsApp वरील बिझनेसेसशी संपर्क साधतात व त्यांच्याशी संभाषण करतात. बिझनेसला कॉल करण्यापेक्षा किंवा ईमेल्स पाठवण्यापेक्षा त्यांना WhatsApp वर चॅट करणे जास्त सोपे वाटते. या बिझनेसेसना त्यांच्या ग्राहकांना WhatsApp वर सर्व्हिस देता यावी यासाठी आम्ही त्या बिझनेसकडून शुल्क आकारतो, लोकांकडून नाही. बिझनेसेसना अनेक अॅप्सवर त्यांची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस व्यवस्थापित करता याव्यात यासाठी काही शॉपिंगविषयक फीचर्समध्ये Facebook चा वापर केला जातो. बिझनेससोबत संभाषण करायचे की नाही हे वापरकर्त्यांना ठरवता यावे यासाठी आम्ही थेट WhatsApp वर आणखी माहिती उपलब्ध करून देणार आहोत.
हे सर्व होत असताना काही लोक इतर अॅप्स वापरून पाहाण्याचा विचार करत आहेत आणि आम्ही ते समजू शकतो. काही अॅप्स असा दावा करत आहेत की, ते लोकांचे मेसेजेस पाहू शकत नाहीत. कृपया लक्षात घ्या, एखादे अॅप एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनचे संरक्षण देत नसेल, तर त्याचा अर्थ ते अॅप तुमचे मेसेजेस वाचू शकते असा होतो. काही अॅप्स असेही म्हणत आहेत की, WhastApp कडे वापरकर्त्यांची जितकी माहिती असते त्यापेक्षा कमी माहिती त्यांच्याकडे असते. लोकांना विश्वसनीय आणि सुरक्षित अॅप हवे आहे असे आम्हाला वाटते, त्यासाठी WhatsApp कडे अतिशय मर्यादित डेटा असणे गरजेचे असले तरीही. आम्ही कोणत्याही निर्णयाचा सखोल विचार करण्यावर भर देतो आणि आम्ही याहीपेक्षा कमी माहितीसह ही जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न करणार आहोत.
लोकांच्या शंकांचे निराकरण करण्यास आम्हाला मदत करणाऱ्या आणि उत्तरे देण्यासाठी हजर राहिलेल्या सर्वांचे मनापासून आभार! २०२१ मध्ये अनेक नव्या गोष्टी खुणावत आहेत आणि येत्या काही आठवड्यांमध्ये, महिन्यांमध्ये त्या शेअर करण्यास आम्ही अतिशय उत्सुक आहोत.
आमच्या अलीकडील अपडेटविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि या अपडेटविषयी लोकांच्या मनात खूप संभ्रम आहे असे आमच्या लक्षात आले आहे. यामुळे खूप गैरसमज पसरलेले आहेत आणि हे चित्र चिंताजनक आहे. त्यामुळेच, आम्ही आमची तत्त्वे आणि काही तथ्ये लोकांना पुन्हा एकदा समजवून देऊ इच्छितो.
WhatsApp एका सरळसाध्या संकल्पनेवर आधारलेले आहे: तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि प्रियजनांसोबत जे काही शेअर करता, ते फक्त तुम्ही आणि तुम्ही ज्यांच्यासोबत शेअर करता आहात ती व्यक्ती यांच्यातच खाजगी राहते. याचाच अर्थ आम्ही तुमची वैयक्तिक संभाषणे नेहमी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित करतो. ही वैयक्तिक संभाषणे कोणीही, अगदी WhatsApp किंवा Facebook देखील वाचू शकत नाही. त्यामुळेच, कोण कोणाला मेसेज किंवा कॉल करते आहे याचे लॉग्स आम्ही ठेवत नाही. तुम्ही तुमचे लोकेशन शेअर केले असेल तर आम्ही तेदेखील पाहू शकत नाही. आम्ही तुमचे संपर्क Facebook सोबत शेअर करत नाही.
अलीकडील अपडेटमुळे यातल्या कशातही काहीही बदल होणार नाही. उलट या अपडेटमध्ये WhatsApp वरील एखाद्या बिझनेसला मेसेज करायचा असल्यास लोकांना वापरावे लागतील असे नवीन पर्याय समाविष्ट करण्यात आले आहेत. तुम्ही हे पर्याय वापरल्यास आम्ही कशाप्रकारे डेटा गोळा करू शकतो अथवा वापरू शकतो याबद्दलही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आज जरी प्रत्येक व्यक्ती WhatsApp वरील बिझनेसवर शॉपिंग करत नसली तरी, भविष्यात बरेच लोक हे पर्याय वापरण्याचा विचार करू शकतील, आणि त्यामुळेच या सर्व्हिसेसविषयी लोकांना माहीत असणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते. या अपडेटमुळे Facebook सह डेटा शेअर करण्याची आमची क्षमता वाढत नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही अपडेटमधील अटी वाचून मान्य करण्यासाठी लोकांना दिलेली मुदत वाढवत आहोत. ८ फेब्रुवारीला कोणाचेही खाते सस्पेंड होणार नाही किंवा डिलीट केले जाणार नाही. 'WhatsApp वरील गोपनीयता आणि सुरक्षा' याविषयी लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्हाला अजून बरेच काम करायचे आहे. बिझनेसशी होणाऱ्या संभाषणांशी निगडीत नवे पर्याय १५ मे ला उपलब्ध होतील, तोपर्यंत लोकांना या अपडेटबद्दल विचार करण्याचा वेळ देण्याचे आम्ही ठरवले आहे.
WhatsApp ने जगभरातील लोकांच्या संभाषणांना एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा देऊ केली आणि ही सुरक्षा आम्ही आज, उद्या, केव्हाही काढून घेणार नाही. ती कायम ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या अपडेटबद्दल स्पष्टीकरण मागण्यासाठी आमच्याशी संपर्क साधणाऱ्या, लोकांना तथ्ये समजावून सांगण्यात आणि त्यांचे गैरसमज दूर करण्यात मदत करणाऱ्या सर्व लोकांचे खूप खूप आभार. WhatsApp ला खाजगी आणि वैयक्तिक संभाषणांचे सर्वोत्तम माध्यम बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ करू.
WhatsApp हे केवळ संवाद साधण्याचेच नाही तर प्रॉडक्ट्स पाहण्याचे, त्यांच्याबद्दल चर्चा करण्याचे व त्यांची विक्री करण्याचेही माध्यम बनत चालले आहे. कॅटलॉग्सच्या मदतीने उपलब्ध असलेली उत्पादने लोकांना चटकन पाहता येतात तसेच बिझनेसनादेखील विशिष्ट प्रॉडक्टसंबंधी झालेली त्यांची चॅट्स ऑर्गनाइझ करण्यास मदत होते. चॅट्समधून शॉपिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे आणि म्हणूनच खरेदी-विक्री करणे अधिकच सोपे करण्याची आमची इच्छा होती.
त्याच प्रयत्नांचे फलित म्हणून WhatsApp वर 'कार्ट्स' हे फीचर दाखल करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. जे बिझनेस एकावेळी अनेक प्रकारच्या प्रॉडक्ट्सची विक्री करतात (जसे की लोकल रेस्टॉरंट किंवा कपड्यांचे दुकान), अशा बिझनेसना मेसेज करायचा असल्यास 'कार्ट्स' हे फीचर उपयुक्त ठरते. कार्ट्सच्या मदतीने लोकांना कॅटलॉग ब्राउझ करता येतो, एकाच वेळी अनेक प्रॉडक्ट्स निवडता येतात आणि ही ऑर्डर एका मेसेजच्या रूपात बिझनेसला पाठवता येते. यामुळे बिझनेसना ऑर्डर्सबद्दलच्या विचारणांचा माग ठेवता येतो, ग्राहकांच्या विनंत्या उत्तम पद्धतीने हाताळता येतात आणि प्रॉडक्ट्सची विक्री मार्गी लावता येते.
उदाहरणार्थ, राजकोटमधील 'उत्तम टॉईज' या स्टोअरला या फीचरचा अर्ली ॲक्सेस मिळाला. त्यांनी आम्हाला सांगितले की, ग्राहकांना प्रॉडक्ट्स ऑर्डर करणे कार्ट्समुळे खूप सोपे झाले आणि ऑर्डर्स ऑर्गनाईझ करण्यासाठी देखील त्यांच्या बिझनेसला याचा उपयोग झाला.
कार्ट्स वापरणे सोपे आहे. तुम्हाला हवे आहे ते प्रॉडक्ट निवडा आणि "कार्टमध्ये जोडा" वर टॅप करा. तुम्हाला हवी असलेली प्रॉडक्ट्स कार्टमध्ये जोडून झाली की, ती ऑर्डर एका मेसेजच्या रूपात त्या बिझनेसला पाठवा. कार्ट्स हे फीचर कसे वापरावे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया हा लेख पहा.
आगामी सणासुदीचा काळ आणि त्यानिमित्ताने होणारी शॉपिंग विचारात घेऊन 'कार्ट्स' हे फीचर आज जगभरात लॉंच होणार आहे. WhatsApp वरील शॉपिंगसाठी शुभेच्छा!
भारतातील WhatsApp वापरकर्त्यांना आजपासून WhatsApp वरून पैसे पाठवता येणार आहेत. पेमेंट्सचा हा अनुभव इतका सुरक्षित असेल की, पैसे पाठवणे मेसेज पाठवण्याइतकेच सोपे वाटेल. या फीचरच्या मदतीने लोक कुटुंबीयांना पैसे पाठवू शकतील किंवा दूर असूनही एखादे उत्पादन विकत घेऊ शकतील आणि रोख रक्कम द्यावी न लागता किंवा पैसे काढण्यासाठी बॅंकेत जावे न लागता त्या खरेदीचे पेमेंट WhatsApp वरून करू शकतील.
WhatsApp ने National Payments Corporation of India (NPCI - नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या भागीदारीत 'पेमेंट्स' हे फीचर डिझाइन केलेले असून यामध्ये Unified Payment Interface (UPI - युनिफाइड पेमेंट इंटरफेस) चा वापर करण्यात आला आहे. ही भारतातील सर्वात पहिली रीअल-टाइम पेमेंट सिस्टीम असेल ज्यामध्ये १६० पेक्षा जास्त बँकांमधील व्यवहारांना सपोर्ट केले जाईल. भारतात आर्थिक सर्वसमावेशकता वाढीस लागावी यासाठी डिजिटल पेमेंट्सना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचा वापर अधिक सुलभ करून देण्यासाठी आम्ही गेली २ वर्षं काम करत आहोत, आणि त्यामुळेच हे फीचर लॉंच करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
WhatsApp वरून पैसे पाठवता यावे यासाठी भारतातील वापरकर्त्यांकडे भारतातील बॅंक खाते व डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. पैसे पाठवणारी आणि पैसे प्राप्त करणारी व्यक्ती यांच्या बॅंक खात्यांमध्ये UPI मार्फत पैशाचे ट्रान्सफर सुरू करण्याच्या सूचना WhatsApp या बॅंकांना (या बॅंकांना पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर असेही म्हणतात) पाठवते. ICICI Bank, HDFC Bank, Axis Bank, State Bank of India आणि Jio Payments Bank या भारतातील पाच अग्रगण्य बँकांबरोबर काम करताना आम्हाला आनंद होत आहे. UPI चा सपोर्ट असलेले कोणतेही ॲप वापरणाऱ्या व्यक्तीला WhatsApp वरून पैसे पाठवता येतील.
'डिजिटल अर्थव्यवस्थेत ग्रामीण भागाचा सहभाग वाढवणे' आणि 'डिजिटल अर्थ सेवांचा लाभ मिळू न शकलेल्या सर्वसामान्य वर्गाला त्या सेवांचा लाभ घेता येणे' ही महत्त्वपूर्ण उद्दीष्ट्ये साध्य करण्यात WhatsApp आणि UPI चे युनिक आर्किटेक्चर स्थानिक संस्थांना उपयुक्त ठरू शकेल.
WhatsApp मधील सर्व फीचर्सप्रमाणे 'पेमेंट्स' या फीचरलाही सर्वोत्तम सुरक्षा आणि गोपनीयता लाभलेली आहे. त्यामुळेच, प्रत्येक पेमेंट करताना वापरकर्त्याला त्याचा स्वतःचा UPI पिन टाकावा लागणार आहे. iPhone आणि Android प्लॅटफॉर्मवर WhatsApp ची नवीनतम आवृत्ती वापरणाऱ्या वापरकर्त्यांना 'पेमेंट्स' हे फीचर उपलब्ध असेल.
WhatsApp वर आलेले मेसेजेस अनेकवेळा आपल्या फोनमध्ये कायम पडून असतात. या मेसेजेसमुळे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांशी झालेली संभाषणे आठवणींच्या रूपाने आपल्याकडे राहतात ही एक उत्तम सोय जरी असली तरी आपल्याकडून जाणारे बरेचसे मेसेजेस तात्कालिक स्वरूपाचे असतात आणि ते आठवणींचा भाग बनून राहण्याची फारशी गरज नसतेच.
तुम्ही समोरासमोर असताना जशी संभाषणे करता तश्याच स्वरूपाची ती WhatsApp वर देखील वाटावीत हे आमचे उद्दिष्ट आहे आणि याचाच अर्थ ती कायमस्वरूपी चॅटमध्ये रेंगाळत राहण्याची निश्चितच आवश्यकता नसते. आणि म्हणूनच, WhatsApp तुमच्यासाठी घेऊन येत आहे - 'एक्स्पायर होणारे मेसेजेस'.
'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू असताना तुम्ही एखाद्या चॅटला मेसेज पाठवलात, तर तो ७ दिवसांनी चॅटमधून नाहीसा होईल. त्यामुळे ते संभाषण नीटनेटके आणि जास्त खाजगी होईल. दोन व्यक्तींमध्ये चॅट होत असेल, तर त्या दोन व्यक्तींपैकी कोणतीही एक व्यक्ती 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू किंवा बंद करू शकते. ग्रुप चॅट्समध्ये मात्र फक्त ॲडमीनच हे फीचर वापरू शकतो.
हे फीचर सुरू असताना मेसेजेस नाहीसे होण्याचा कालावधी आम्ही सध्या ७ दिवसांचा ठेवलेला आहे. यामुळे तुम्हाला चॅटमध्ये काय सुरू आहे याचा मागही ठेवता येईल आणि ते संभाषण फोनमध्ये कायमचे राहणार नाही आहे या विचाराने एक प्रकारची आश्वस्ततादेखील येईल. थोडक्यात, काही दिवसांपूर्वी तुम्हाला कोणी एखाद्या दुकानाचा पत्ता पाठवला असेल किंवा शॉपिंगची यादी पाठवली असेल, तर ती तुम्हाला गरज असेल तोपर्यंत तुमच्या फोनमध्ये राहील आणि गरज संपल्यावर नाहीशी होईल. 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर आणि ते कसे सुरू करावे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
आम्ही 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर याच महिन्यात सगळीकडे लॉंच करणार आहोत. तुम्हाला ते आवडेल अशी आशा आहे.
मागील काही वर्षांमध्ये वैयक्तिक पातळीवरील संभाषणांसाठी मेसेजिंग ॲप्सचा वापर करण्यास पसंती मिळत असल्याचे आम्हाला दिसून आले आहे आणि बिझनेस करण्याकरिताही लोक जास्तीत जास्त प्रमाणात WhatsApp चा वापर करू लागले आहेत.
लोक आणि बिझनेस यांच्यामधील संभाषण ज्या पद्धतींनी व्हायचे त्या पद्धतीही आता जुन्या झाल्या आहेत. फोन कॉल्स, ईमेल्स आणि एसएमएस यांसारख्या नवीन संभाषण माध्यमांच्या व्यवस्थापनावर बिझनेसेस वर्षभरात अब्जावधी डॉलर्स खर्च करत असले तरी लोकांना अजूनही त्यांचा कॉल होल्डवर ठेवला जाणे, कॉल एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पास केला जाणे किंवा बिझनेसला पाठवलेला मेसेज व्यवस्थित पोहोचला आहे का यावर विचार करत राहणे रुचत नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
जागतिक स्तरावरील साथीच्या काळात तर बिझनेसना त्यांच्या ग्राहकांना सर्व्हिस देण्यासाठी आणि प्रॉडक्ट्सची विक्री करण्यासाठी वेगवान व कार्यक्षम संभाषण पद्धतींची अधिक गरज वाटू लागली आहे. आणि अशा काळात WhatsApp ने त्यांच्यासाठी संभाषणाचा एक साधासोपा आणि सोयिस्कर मार्ग खुला करून दिला आहे. दररोज १७.५ कोटी लोक WhatsApp Business खात्यांना मेसेजेस पाठवतात. लोकांना प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी मदत हवी असेल तर ते बिझनेसला मेसेज करण्यास प्राधान्य देतात आणि त्यांना तशी सोय उपलब्ध असेल तर ते प्रॉडक्ट किंवा सेवा खरेदी करण्याची शक्यता जास्त असते, असे आमच्या संशोधनातून दिसून आले आहे.
अर्थात, आम्हाला त्यात आणखी बऱ्याच सुधारणा करायच्या आहेत. मागील दोन वर्षांच्या कालावधीमध्ये आम्ही लहानमोठ्या बिझनेसना त्यांची चॅट्स व्यवस्थापित करण्यासाठी WhatsApp Business ॲप आणि WhatsApp Business API चा पर्याय देऊ केला आहे. कोणते उपाय लागू पडत आहेत आणि काय पसंतीस उतरते आहे याबद्दलचा फीडबॅक ऐकल्यानंतर, WhatsApp हे ॲप 'मेसेजिंग'ला ग्राहक आणि बिझनेस यांच्यातील संभाषणाचा दुवा बनवू शकते याबद्दल आमची खात्री पटली आहे. यासाठी आम्ही खालील क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढवत आहोत:
बहुतेक लोक त्यांच्या मित्रमैत्रिणींशी, कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी WhatsApp चा वापर करतात आणि हेच लक्षात घेऊन आम्ही त्यांच्यासाठी नवनवीन फीचर्स विकसित करत राहू आणि लोकांची खाजगी संभाषणे सुरक्षित ठेऊ.
WhatsApp ची ही नवनवीन फीचर्स आणि त्यातून येणारे अनुभव जवळच्या-दूरच्या, देशातल्या-परदेशातल्या लोकांना आणि बिझनेसना अत्यंत उपयुक्त ठरतील असा आम्हाला विश्वास वाटतो. आम्ही आमच्या पुढील प्रवासासाठी अतिशय उत्सुक आहोत. पुढील काही महिन्यांमध्ये आम्ही या सर्व्हिसेस टप्प्याटप्प्याने लॉंच करू.
खूप वेळा फॉरवर्ड होत होत अनेक चॅटवर शेअर केल्या गेलेल्या मेसेजेसना फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसचे स्पेशल लेबल लावले जाते. असा मेसेज तुम्हाला तो पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतः लिहिलेला नसून त्यांना दुसरीकडून आलेला आणि त्यांनी पुढे फॉरवर्ड केलेला मेसेज आहे हे या दोन बाणांच्या चिन्हावरून
आजपासून, चॅटमधील भिंगाच्या चिन्हावर टॅप करून अशा प्रकारचे मेसेजेस तपासून घेण्याचा साधासोपा पर्याय प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. अनेक वेळा फॉरवर्ड झालेल्या मेसेजेसचा शोध घेण्याचा साधासोपा पर्याय देऊ केल्याने लोकांना त्या मेसेजेसविषयी नवी माहिती किंवा त्यांचे स्रोत कळण्यातही मदत होईल.
या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना ब्राउझरद्वारे वेबवर मेसेज लोड करता येतो. तो मेसेज WhatsApp सोबत शेअर करण्याची गरज भासत नाही.
'वेबवर शोध घ्या' हे फीचर आजपासून ब्राझील, इटली, आयर्लंड, मेक्सिको, स्पेन, यूके आणि यूएस या देशांमध्ये Android, iOS आणि WhatsApp वेब या प्लॅटफॉर्म्सवरील WhatsApp च्या नवीनतम आवृत्त्यांसाठी उपलब्ध होईल.
जगभरातील बिझनेस आता पुन्हा सुरू होत आहेत आणि ते ऑनलाइन बिझनेसचा मार्ग चोखाळण्याचा विचार करत आहेत. अशा वेळी लोकांना एखाद्या बिझनेसशी कनेक्ट करण्यासाठी, एखादे प्रॉडक्ट खरेदी करण्याची इच्छा असल्यास त्याबाबत प्रश्न विचारण्यासाठी, प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसविषयी माहिती मिळवण्यासाठी सुलभ मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक झाले आहे.
सध्याच्या घडीला ५ कोटींहून जास्त वापरकर्ते WhatsApp Business चा वापर करत आहेत. WhatsApp Business API वरील अशा अनेक लहानमोठ्या बिझनेसची माहिती लोकांना व्हावी यासाठी आम्ही लोकांना WhatsApp वर बिझनेससोबत चॅट सुरू करण्यात आणि त्यांची प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस पाहण्यात मदत करणारे फीचर दाखल करत आहोत.
क्यु आर कोड्स वापरून बिझनेससोबत चॅट सुरू करणे
क्यु आर कोड्स हा एखाद्या बिझनेससोबत चॅट सुरू करण्याचा सर्वात सोपा डिजिटल मार्ग आहे. यापूर्वी लोकांना एखादा बिझनेस किंवा त्यांची उत्पादने आवडली तर त्या बिझनेसचा नंबर संपर्क म्हणून समाविष्ट करायला लागायचा. बिझनेसचे अनेक नंबर असतील तर ते नंबर्स एकावेळी एक अशा पद्धतीने जोडायला लागायचे. पण आता लोकांना बिझनेसशी चॅट सुरू करायचे असल्यास फक्त त्या बिझनेसचा त्यांच्या स्टोअरमधला, प्रॉडक्टच्या पॅकेजिंगवर किंवा पावतीवर असलेला क्यु आर कोड स्कॅन करायचा आहे.
Uttam Toys (उत्तम टॉइज) हे भारतातील राजकोट येथील खेळण्यांचे दुकान आहे. त्यांनी या फीचरची चाचणी घेण्यात आमची मदत केली होती. हे दुकान त्यांच्या प्रॉडक्ट्सच्या पॅकेजिंगवर आणि खेळण्यांच्या मॅन्युअलवर क्यु आर कोड टाकते. ग्राहकांना प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसविषयी प्रश्न असल्यास ते या क्यु आर कोडच्या मदतीने या बिझनेसशी संपर्क साधू शकतात.
हा क्यु आर कोड स्कॅन केल्यावर चॅट उघडते आणि त्यात बिझनेसचा स्वागत संदेश दिसतो. या मेसेजमधून तुम्ही त्या बिझनेसशी संभाषण सुरू करू शकता. बिझनेस ते चॅट पुढे सुरू ठेवण्यासाठी या ॲपची मेसेजिंग टूल्स वापरून कॅटलॉग इ. सारखी माहिती तात्काळ पाठवू शकेल. एखाद्या बिझनेसला क्यु आर कोड चा वापर सुरू करायचा असल्यास त्यांनी या पायऱ्या फॉलो कराव्यात.
क्यु आर कोड हे फीचर WhatsApp Business ॲप किंवा WhatsApp Business API वापरणाऱ्या जगभरातील बिझनेसना आजपासून उपलब्ध होणार आहे.
बिझनेसच्या प्रॉडक्ट्सची किंवा सर्व्हिसेसची माहिती देण्यासाठी कॅटलॉग शेअर करणे
कॅटलॉगच्या मदतीने बिझनेसना त्यांची प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस यांची माहिती देता येते आणि ती माहिती शेअर करता येते. यामुळे तिथल्या तिथे विक्री पूर्ण होऊ शकते. कॅटलॉग हे फीचर गेल्या वर्षी लॉंच करण्यात आले होते आणि तेव्हापासून ते लोक आणि बिझनेस यांच्यातील संभाषणाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. आकडेवारीनुसार दर महिन्याला ४ कोटींहून अधिक लोक बिझनेस कॅटलॉग पाहतात असे दिसून आले आहे.
लोकांना प्रॉडक्ट्स दिसावीत, कळावीत यासाठी आम्ही कॅटलॉग तयार करतो आणि त्या कॅटलॉगमध्ये उपलब्ध असलेले प्रत्येक प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लिंकच्या स्वरूपात वेबसाइट्सवर, Facebook, Instagram वर तसेच इतर प्लॅटफॉर्म्सवर शेअर करता येते. याशिवाय, लोकांना कॅटलॉग किंवा एखादे प्रॉडक्ट/सर्व्हिस त्यांच्या मित्रमैत्रीणींसोबत किंवा कुटुंबीयांसोबत शेअर करायचे असेल, तर ते फक्त त्याची लिंक कॉपी करून ती लिंक WhatsApp वर किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवर शेअर करू शकतात.
कॅटलॉग लिंक्सची सुविधा जगभरातील लोकांना उपलब्ध आहे. कॅटलॉग लिंक्स कशा शेअर कराव्यात हे येथे पहा.
ऑनलाइन बिझनेसचे नवे वास्तव अंगवळणी पडताना बिझनेसना वेळ लागणार आहे आणि त्यादृष्टीने येणारा काळ खूप आव्हानात्मक असणार आहे, पण आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत.
जगभरात वापरल्या जाणाऱ्या WhatsApp ला अब्जावधी लोकांचे प्रेम लाभले आहे. या ॲपच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा साधासोपा, विश्वसनीय व खाजगी प्लॅटफॉर्म देऊ करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. असे असले तरी, या ॲपची उपयुक्तता आणखी वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करत राहणार आहोत.
या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल म्हणून आम्ही पुढील काही आठवड्यांमध्ये काही नवीन फीचर्स घेऊन येत आहोत:
वापरकर्त्यांना ही फीचर्स येत्या काही आठवड्यांमध्ये WhatsApp च्या नवीन आवृत्तीमध्ये पाहायला मिळतील.