आम्हाला हे कळवताना अत्यंत आनंद होत आहे की, आजपासून आम्ही ब्राझिलमधील वापरकर्त्यांसाठी WhatsApp वरील डिजिटल पेमेंट्स चा पर्याय उपलब्ध करून देत आहोत. या फीचरच्या मदतीने आता लोकांना चॅटमधून बाहेर पडावे न लागता सुरक्षितरीत्या पैसे पाठवता येणार आहेत किंवा एखाद्या स्थानिक बिझनेसची उत्पादने किंवा सेवा खरेदी करता येणार आहेत.
ब्राझिलमध्ये कोट्यावधी लघुउद्योग आणि लघुतम उद्योग आहेत. त्यामुळे प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी एखाद्या बिझनेसला झॅप करणे अर्थात ऑटोमेटेड उत्तरप्रणाली सेट करणे ही तिथली नित्याचीच बाब आहे. या फीचरमुळे आता लोकांना एखाद्या बिझनेसचा कॅटलॉग बघता येणार आहेच, शिवाय एखादे उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यासाठी पेमेंटदेखील पाठवता येणार आहे. पेमेंट्स पाठवणे सोपे झाले तर, अधिकाधिक बिझनेस डिजिटल इकॉनॉमीचा पर्याय चोखाळण्याचा विचार करतील आणि त्यांना वाढीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील.
याशिवाय पैसे पाठवणे मेसेज पाठवण्याइतके सोपे करून लोकांमधले शारीरिक अंतर दूर करणे हेदेखील आमचे उद्दीष्ट्य आहे. WhatsApp वरील पेमेंट्स Facebook Pay उपलब्ध करून देत आहे, त्यामुळे या पेमेंट्ससाठी वापरत असलेली कार्ड माहिती तुम्हाला पुढे Facebook च्या इतर ॲप्ससाठी वापरता येईल अशीही सोय करण्याची आमची इच्छा आहे.
पेमेंट्स हे फीचर तयार करताना 'सुरक्षा' हा मुख्य मुद्दा विचारात घेण्यात आला असल्याने अवैध व्यवहार रोखण्यासाठी सहा अंकी खास पिन नंबर किंवा फिंगरप्रिंट आवश्यक असेल. सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही Visa आणि Mastercard च्या नेटवर्कवर Banco do Brasil, Nubank आणि Sicredi च्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्सना सपोर्ट देऊ. यासाठी आम्ही Cielo या ब्राझिलमधील अग्रगण्य पेमेंट्स प्रोसेसर कंपनीसोबत मिळून काम करत आहोत. येत्या काळात अधिकाधिक भागीदार कंपन्यांना आमच्यासोबत काम करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आमचे मॉडेल मुक्त स्वरूपाचे ठेवले आहे.
WhatsApp वरून पैसे पाठवणे किंवा काहीतरी खरेदी करणे हे पूर्णपणे मोफत असणार आहे. क्रेडिट कार्डावरून होणारी पेमेंट्स प्राप्त करताना बिझनेसना फी द्यावी लागते, त्या धर्तीवर या प्लॅटफॉर्मवरदेखील ग्राहकांकडून येणारी पेमेंट्स प्राप्त करण्यासाठी बिझनेसना प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे.
WhatsApp वरील पेमेंट्स हे फीचर ब्राझिलमधील लोकांना आजपासून उपलब्ध होणार आहे. हे फीचर कालांतराने जगभरातील सर्व लोकांना उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आहे.