आम्हाला हे शेअर करण्यास खूप आनंद होत आहे की आता जगभरात दोन अब्ज लोक WhatsApp वापरतात.
वडीलधारी माणसं त्यांच्या जिवलगांच्या ते जगाच्या पाठीवर कोठेही असले तरीही अगदी सहज संपर्कात येऊ शकतात. बहीण भावंडं एकमेकांशी मौल्यवान क्षण शेअर करू शकतात. सहकर्मचारी एकमेकांशी सहयोग वाढवू शकतात आणि ग्राहकांशी सहज कनेक्ट होऊन व्यवसाय वृद्धिंगत करू शकतात.
खाजगी संभाषणे, जी पूर्वी केवळ समोरासमोरच करणे शक्य असायचे ती आता चॅट्स आणि व्हिडिओ कॉलिंग द्वारे चटकन करता येतात. WhatsApp च्या या वाटचालीमध्ये अनेक महत्त्वाचे आणि मौलिक क्षण येऊन गेले आहेत. आम्ही एवढी मोठी मजल मारू शकलो याबद्दल आम्ही ऋणी असून हा आम्हाला आमचा सन्मान वाटतो.
आम्हाला कल्पना आहे की, जेवढे अधिक लोक संपर्कात येतील तेवढीच सुरक्षा देखील आम्हाला वाढवावी लागेल. आजकाल आपला ऑनलाईन वावर बराच वाढला असल्याने आपली संभाषणे सुरक्षित ठेवणे अधिकाधिक महत्त्वपूर्ण होत आहे.
आणि म्हणूनच WhatsApp वर पाठवलेले खाजगी संदेश हे मूलभूतरीत्या एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनने कूटबद्ध करून सुरक्षित केलेले आहेत. सशक्त एन्क्रिप्शन हे एका अभेद्य डिजिटल लॉक प्रमाणे कार्य करते जे तुम्ही WhatsApp वर पाठवत असलेली माहिती सुरक्षित ठेवते आणि तुम्हाला हॅकर्स आणि गुन्हेगारांपासून संरक्षण देते. संदेश हे तुमच्या फोनवरच ठेवले जातात आणि कोणीही हस्तक्षेप करून ते वाचू शकत नाहीत किंवा तुमचे कॉल्स ऐकू शकत नाहीत, अगदी आम्हीदेखील नाही. तुमची खाजगी संभाषणे तुमच्यामध्येच राहतात.
या आधुनिक काळामध्ये सशक्त एन्क्रिप्शन असणे अतिशय गरजेचे आहे. आम्ही सुरक्षेमध्ये कधीही तडजोड करणार नाही कारण तसे केल्यास लोकांची सुरक्षितता कमी होऊ शकते. अधिक सुरक्षेसाठी आम्ही उच्च सुरक्षा तज्ञांबरोबर काम करतो आणि इंडस्ट्रीमधील अग्रेसर टेक्नॉलॉजीचा वापर करून गैरवापर होणे थांबवितो तसेच, ते नियंत्रित करण्यासाठी व तक्रार नोंदवण्यासाठी गोपनीयतेशी तडजोड न करता विविध साधने प्रदान करतो.
लोकांना सोपी, सुरक्षित आणि खाजगी सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशानेच WhatsApp ची सुरुवात झाली होती. सुरुवातीला आम्ही जसे होतो तसेच आजही, जगभरातील लोकांना खाजगीरित्या कनेक्ट होण्यास मदत करण्यासाठी आणि जगभरातील दोन अब्ज लोकांची वैयक्तिक संभाषणे सुरक्षित ठेवण्यासाठी वचनबद्ध आहोत.
१२ फेब्रुवारी २०२०