एप्रिल ६, २०२१
WhatsApp अभिमानाने जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) सोबत "Vaccines for All" (सर्वांसाठी लस) नावाच्या एका नवीन स्टिकर संग्रहाची घोषणा करत आहे. आम्हाला आशा आहे की हे स्टिकर्स लोकांना कोविड-१९ लसींमुळे निर्माण झालेल्या शक्यातांबद्दल आनंद, दिलासा आणि आशा खाजगीत एकमेकांसोबत व्यक्त करण्यासाठी तसेच या प्रदीर्घ आणि कठीण काळात जीवनरक्षक म्हणून कार्य करणार्या आरोग्यकर्मींप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक रंजक आणि सर्जनशील मार्ग उपलब्ध करून देतील.
या महामारीच्या सुरुवातीपासूनच आम्ही १५० हून अधिक राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक सरकारांसोबत तसेच डब्ल्यूएचओ आणि युनिसेफ यांसारख्या संस्थांसोबत आमच्या २ अब्जांहून अधिक वापरकर्त्यांना अचूक माहिती आणि संसाधनांशी जोडण्यासाठी कोविड-१९ हेल्पलाइन्सबाबत भागीदारी केली आहे. या जागतिक हेल्पलाइन्सद्वारे गेल्या वर्षभरात ३ अब्जांपेक्षा अधिक मेसेजेस पाठवले गेले आहेत.
या महामारीने अनेक देशांमध्ये एका नवीन टप्प्यात प्रवेश केला असताना इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना, ब्राझिल आणि भारत या देशांमधील सरकार या हेल्पलाइन्सच्या मदतीने नागरिकांना खाजगीपणे लसीची अचूक माहिती आणि नोंदणी यांच्याशी जोडत आहेत. इंडोनेशियामध्ये या सर्व्हिसद्वारे पहिल्या ५ दिवसांमध्येच ५००,००० वैद्यकीय कर्मचार्यांनी लस घेण्यासाठी नोंदणी केली.
आम्ही, सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना जगभरातील शक्य तितक्या जास्तीत जास्त लोकांना, खासकरून दूरस्थ भागात राहणारे लोक आणि उपेक्षित गटांना लसीची माहिती आणि सर्व्हिसेसशी जोडण्यास मदत करू इच्छितो. आम्ही आमच्या WhatsApp Business API द्वारे पाठवण्यात येणार्या मेसेजेसमधून प्राप्त होणारे शुल्कदेखील माफ केले आहे.
काही देशांमध्ये वैयक्तिकरित्या एकत्र येण्याकडे आमची वाटचाल हळूहळू सुरू असताना, आम्ही आशा करतो की लोक त्यांचे खाजगी विचार व अनुभव - आणि आशा - त्यांचे कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसोबत WhatsApp वर शेअर करणे असेच पुढे चालू ठेवतील.
"Vaccines for All" (सर्वांसाठी लस) हा स्टिकर संग्रह आता WhatsApp मध्ये उपलब्ध आहे.