१८ जानेवारी, २०१६
आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांशी संपर्कात राहण्यासाठी आता जगभरातून जवळजवळ १ अब्जहूनही अधिक लोक WhatsApp चा वापर करतात. अगदी इंडोनेशिया मधील नुकतेच वडील झालेले कोणी एखादे त्यांच्या कुटुंबियांसोबत फोटो शेअर करणारी व्यक्ती असो कि स्पेनमधील विदयार्थी त्याच्या पूर्वीच्या मित्राची चौकशी करत असो कि ब्राझील मधील डॉक्टर्स त्यांच्या रुग्णांशी संपर्क ठेवत असो, सर्व लोक WhatsApp वर त्याच्या जलद, सुलभ आणि विश्वासार्ह सेवेमुळे विसंबून राहतात.
आणि म्हणूनच आम्हाला हे घोषित करत असताना अतिशय आनंद होत आहे की WhatsApp आता येथून पुढे सबस्क्रिप्शन शुल्क लागू करणार नाही. गेली अनेक वर्ष, आम्ही काही वापरकर्त्यांना पहिल्या वर्षानंतर काही शुल्क आकारत असू. जसे आमचा विस्तार वाढत गेला तसे आमच्या लक्षात आले की ही पद्धती योग्य नव्हती. अनेक WhatsApp वापरकर्त्यांकडे डेबिट अर्थात क्रेडिट कार्ड नंबर नसत आणि त्यामुळे त्यांना अशी भीती वाटे की एका वर्षानंतर त्यांच्या आप्तेष्टांबरोबरचा संपर्क तुटेल. त्यामुळे पुढील काही आठवड्यामध्ये, आम्ही अॅपच्या विविध आवृत्तींमधून फी आकारणे काढून टाकू आणि येथून पुढे आमच्या सेवा वापरण्यासाठी कोणतेही शुल्क पडणार नाही.
अर्थातच, लोकांना आश्चर्य वाटेल की नोंदणी शुल्क रद्द केले तर WhatsApp कार्य करणे कसे चालू ठेवेल आणि याचा अर्थ आम्ही तृतीयपक्षी जाहिरातींना मान्यता देत आहोत असा तर नाही ना. याचे उत्तर - 'नाही' असे आहे. या वर्षीपासून आम्ही अशी काही साधने टेस्ट करू ज्यामुळे तुम्ही अशा काही व्यवसायांशी आणि संस्थांशी WhatsApp वापरून संवाद साधू शकता ज्यामध्ये तुम्हाला रस असेल. याचा अर्थ तुम्ही तुमच्या बँकेशी संवाद साधू शकता आणि जाणून घेऊ शकता की तुमच्या खात्यामध्ये काही संशयास्पद घडामोडी झाल्या आहेत का, किंवा एअरलाईनशी संपर्क साधून उशीर झालेल्या फ्लाईटबद्दल जाणून घेऊ शकता. आपण सर्व हे इतर मार्गांनी सध्या जाणून घेऊच शकतो - जसे की टेक्स्ट मेसेज आणि फोन कॉल - त्यामुळेच आम्ही नवीन काही साधने टेस्ट करत आहोत ज्यामुळे हे सर्व WhatsApp वर करणे अतिशय सोपे होईल आणि आम्ही कोणत्याही तृतीय पक्षी जाहिराती आणि स्पॅम शिवाय तुम्हाला उत्तम सेवा प्रदान करू शकू.
आम्हाला अशी आशा आहे की तुम्ही WhatsApp मध्ये येऊ घातलेल्या बदलांचे उत्साहाने स्वागत कराल, आम्ही आपल्या अभिप्रायाचे नेहमीच स्वागत करू.