WhatsApp वर आलेले मेसेजेस अनेकवेळा आपल्या फोनमध्ये कायम पडून असतात. या मेसेजेसमुळे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांशी झालेली संभाषणे आठवणींच्या रूपाने आपल्याकडे राहतात ही एक उत्तम सोय जरी असली तरी आपल्याकडून जाणारे बरेचसे मेसेजेस तात्कालिक स्वरूपाचे असतात आणि ते आठवणींचा भाग बनून राहण्याची फारशी गरज नसतेच.
तुम्ही समोरासमोर असताना जशी संभाषणे करता तश्याच स्वरूपाची ती WhatsApp वर देखील वाटावीत हे आमचे उद्दिष्ट आहे आणि याचाच अर्थ ती कायमस्वरूपी चॅटमध्ये रेंगाळत राहण्याची निश्चितच आवश्यकता नसते. आणि म्हणूनच, WhatsApp तुमच्यासाठी घेऊन येत आहे - 'एक्स्पायर होणारे मेसेजेस'.
'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू असताना तुम्ही एखाद्या चॅटला मेसेज पाठवलात, तर तो ७ दिवसांनी चॅटमधून नाहीसा होईल. त्यामुळे ते संभाषण नीटनेटके आणि जास्त खाजगी होईल. दोन व्यक्तींमध्ये चॅट होत असेल, तर त्या दोन व्यक्तींपैकी कोणतीही एक व्यक्ती 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू किंवा बंद करू शकते. ग्रुप चॅट्समध्ये मात्र फक्त ॲडमीनच हे फीचर वापरू शकतो.
हे फीचर सुरू असताना मेसेजेस नाहीसे होण्याचा कालावधी आम्ही सध्या ७ दिवसांचा ठेवलेला आहे. यामुळे तुम्हाला चॅटमध्ये काय सुरू आहे याचा मागही ठेवता येईल आणि ते संभाषण फोनमध्ये कायमचे राहणार नाही आहे या विचाराने एक प्रकारची आश्वस्ततादेखील येईल. थोडक्यात, काही दिवसांपूर्वी तुम्हाला कोणी एखाद्या दुकानाचा पत्ता पाठवला असेल किंवा शॉपिंगची यादी पाठवली असेल, तर ती तुम्हाला गरज असेल तोपर्यंत तुमच्या फोनमध्ये राहील आणि गरज संपल्यावर नाहीशी होईल. 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर आणि ते कसे सुरू करावे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
आम्ही 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर याच महिन्यात सगळीकडे लॉंच करणार आहोत. तुम्हाला ते आवडेल अशी आशा आहे.