४ मार्च २०२१
आम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, आता WhatsApp च्या डेस्कटॉप ॲपवरून सुरक्षित आणि गोपनीय वन-टू-वन व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरात WhatsApp वरून व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे असे आम्हाला दिसले. हे कॉल्स अनेकदा प्रदीर्घ होते असेही आमच्या लक्षात आले. नववर्षाच्या पूर्वसंध्येला तर एकाच दिवसात विक्रमी १.४ अब्ज व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स करण्यात आले होते. अनेक लोक आपल्या कुटुंबापासून, प्रियजनांपासून दूर आहेत, कामाच्या नव्या पद्धतीशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत आहेत हे आम्ही जाणतो. तुम्ही जगभरात कुठेही असा, कोणतेही डिव्हाइस वापरत असा, तुम्हाला तुमची संभाषणे समोरासमोर होणाऱ्या संभाषणांइतकीच जवळची वाटावी असे WhatsApp ला वाटते.
हे कॉल्स मोठ्या स्क्रीनवर करता आले तर काम करणे, सहकाऱ्यांशी बोलणे सोपे होते, तसेच तुमच्या कुटुंबीयांना मोठ्या स्क्रीनवर स्पष्टपणे पाहता येते. शिवाय, कॉलवर बोलण्यासाठी हाताची गरज लागत नसल्याने बोलता बोलता रूममध्ये फिरताही येते. डेस्कटॉप कॉलिंग अधिक उपयुक्त ठरावे यासाठी आम्ही ते पोर्ट्रेट आणि लॅंडस्केप अशा दोन्ही मोडमध्ये काम करेल याची खात्री केली आहे. कॉलिंग विंडो ही तुमच्या कॉंप्युटर स्क्रीनवर एका स्टॅंडअलोन, आकार कमीजास्त करता येणाऱ्या विंडोच्या स्वरूपात सर्वात वर दिसत असल्याने ब्राउझर टॅबमध्ये किंवा सुरू असलेल्या इतर विंडोजमध्ये तुमचे व्हिडिओ चॅट हरवून जाणार नाही याचीही खात्री करण्यात आली आहे.
WhatsApp वरील व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असतात. तुम्ही तुमच्या फोनवरून कॉल करा किंवा कॉंप्युटरवरून, WhatsApp हे कॉल्स ऐकू किंवा पाहू शकत नाही. तुम्हाला अतिशय विश्वसनीय आणि उच्च दर्जाचा कॉलिंग अनुभव मिळावा यासाठी आम्ही WhatsApp डेस्कटॉप ॲपवर सर्वप्रथम वन-टू-वन कॉल्सची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. कालांतराने, आम्ही या फीचरमध्ये ग्रुप व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही समाविष्ट करणार आहोत.
लोकांना त्यांच्या कुटुंबासोबत व प्रियजनांसोबत सुरक्षित आणि गोपनीय कॉलिंगचा अनुभव आवडेल अशी आशा वाटते. Windows पीसीवर किंवा Mac वर डेस्कटॉप ॲप कसे डाउनलोड करावे याबद्दल आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी हा लेख पहा.